नमस्कार,
मी किरण.
चित्रानी आमच्या भांडाभांडी, वादावादीबद्दल लिहीलेलं बघितलं आणि मला पण लिहायची खुमखुमी आली. पण माझ्यासाठी हे असं स्वतःला व्यक्त करणं हे जरा अवघड आहे. चित्राबाईतर हाडाच्या पत्रकार, त्यामुळे लिहिणं त्यांना काही अवघड नाही. नको म्हटलं तरी लिहीतात. पण म्हटलं चला प्रयत्न तर करूयात जमलं तर जमलं... नाही तर नाही.
ई सकाळ साठी आम्ही केलेली ही सातवी किंवा आठवी साईट आहे. प्रत्येक साईटच्या वेळी वादावादी ही ठरलेलीच. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी केलेली "मोरया'ची साईट अप झाल्याबरोबरच चित्राची भूणभूण सुरू लागली. दीपोत्सवचं डिझाईन कधी करायचं. माझं मुळ काम हे "सकाळ'च्या प्रिंट एडिशनचं. ई सकाळचं काम हे फावल्या वेळातलं. त्यात दिवाळीचा सिझन प्रिंटसाठी फारच महत्त्वाचा. त्यामुळे किती वेळ देता येईल सांगता येत नव्हतं. त्यात यांचा ससेमीरा मागे लागलेला. इथे आमची नवी वेब डिझायनर प्रिया मदतीला आली. डिझाईनचा पार्ट मी आणि html कोडींग तिनं करायचं अशी मांडवली झाली. आणि साईटचं काम सुरू झालं. 22 ऑक्टोबरचा मुहूर्त साईटच्या लाईव्ह टेस्टींगसाठी ठरला. नेहमीप्रमाणे चित्रानं कुठल्यातरी वहीतल्या कागदावर खरडून ठेवलेला साईट प्लॅन सादर केला आणि वादावादीचा श्रीगणेशा झाला. मी चिडचीड केल्यावर माझ्यावर जळफळत का होईना चित्रानी व्यवस्थित टाईप करून साईट प्लॅन तयार केला. जसजसं काम सुरू झालं तसतसं चित्रानी आपल्यामागे किती काम लावलंय याचा अंदाज यायला लागला. सेक्शन्स, सबसेक्शन्स, ऑडिओ दिवाळी अंक "बोलता बोलता', स्वरोत्सव.... इत्यादी इत्यादी सेक्शन्स बघून घाम फुटला. बर बाईंनी त्यांचं काम आधीच सुरू केलेलं आणि आमच्याकडे मात्र कमी दिवस. त्यात आम्ही एकत्र आलो की चित्रानी ""चला आढावा बैठक घेऊया'' असं म्हणण्याचा नवा उपक्रम सुरू केला. त्यामुळे आमच्या नव्या डिझायनर गोंधळून गेल्या. तशा त्या कायमच गोंधळलेल्या असतात. त्यात अणखी ही भर. त्यांना या असल्या प्रकारांची सवय नव्हती. मी प्रिंटमध्ये असल्याने माझी कामाची जागा वेगळी आहे पण प्रिया बिचारी चित्राच्या शेजारीच बसायला. मग काय सांगता! (समजून घ्या.)
असो, मग यातून रोजच्या रोज करायच्या कामांची यादी केली गेली आणि प्रिया बाईंनी धडाडीनी कामाला सुरवात केली. आणि एक काम चार वेळा केल्याशिवाय तिला ते काम पूर्ण केल्याचा आनंदच मिळत नाही की काय असं वाटायला लागलं. अर्थात नवीन असल्यामुळे हे होत होतं. होता होता साईट शेवटच्या टप्प्यात आली. आणि त्याचवेळी चित्रानी होमपेजवरची बटन्स बटबटीत झालेली आहेत असं घोषीत केलं. आणि मोठ्या कष्टानी चित्रानी एडिटींग करून तयार केलेले ऑडिओ ड्राय वाटताहेत असं मी घोषीत केलं. झालं..... पुन्हा वादावादी....मला डिझायनिंग मधलं कसं कळत नाही आणि त्यांचं संपादकीय ज्ञान हे कसं अर्धवट आहे हे दोघांचंही एकमेकांना सांगून झालं. शेवटी दोघांनीही या गोष्टी मान्य करून पुन्हा केल्या ही गोष्ट अलाहीदा.
आता साईट करायला घेतली की आमची ही भांडणं सगळ्यांना नेहमीचीच झालीयेत. आमच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. आणि चित्रा म्हणजे बोलण्यात कुणाला हार जाणारी नाही. रागावल्यावर त्यांची मुक्ताफळं ऐकली की भलेभले गार होतात.
त्यात आमच्याकडची आणखी एक वल्ली म्हणजे श्रीयुत विश्वनाथ गरुड, न्यूज अपडेटची जबाबदारी सांभाळतात आणि त्याबरोबर आमची साईट झाली की ," तुम्ही xxx ही साईट बघा, तसं करायला पाहिजे " असं म्हणून आगीत तेल ओतायचं कामही आवडीनं करतात.
सम्राटचे, आमच्या वेब एडिटरचे यामध्ये हाल होत असावेत. त्याच्यामागे न्यूज अपडेट्सपासून "सकाळ लाईव्ह' या आमच्या एसएमएस सर्व्हिस ला काय एसएमएस द्यायचा , रजा, सुट्टांचे नियोजन, ई सकाळच्या वाचकांनी जगभरातून पाठवलेल्या मेल्सना उत्तरं देणं अशी शंभर कामं असतात. त्यामुळे आमची साइट लाईव्ह होईपर्यंत तो वैतागत असणार, म्हणजे तो दाखवतो तरी तसं... उगाच नाही त्याला वेबएडिटर केला.
असो, होता होता 18 तारीख उगवली आणि एक दिवस काम करता करता चित्रा मॅडमनी त्यांच्या थैलीतून सफरचंद काढलं आणि केली सुरवात गिळायला. आम्ही (म्हणजे मी) तिला म्हटलं एकटीच काय खातेस, पचणार नाही. यावर उत्तर... ""अरे जा रे, खड्डयात गेलास''. पण शेवटी जे व्हायला नको तेच झालं.. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली. दुसऱ्या दिवशी बाईंचा फोन... तुझी बत्तीशी वाजली, आजारी पडलेय.. अख्खे तीन दिवस बाई गायब. बिचारे डिझायनर हवालदिल. पण शेवटी ठरल्याप्रमाणे 22 तारखेला साईट ऑनलाईन टेस्टींगला गेली आणि आता साईट लाईव्ह पण झालीये. आता आम्ही वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची. आम्ही कितीही भांडलो, वादावादी झाली तरी शेवटी हे सगळं आपल्यापरीनं साईट चांगली होण्यासाठीच असतं. फक्त हे साइट लाईव्ह झाल्यावर आमच्या लक्षात येतं. लोकांच्या साईटविषयीच्या चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या की आम्ही परत तयारी करतो आमच्या मनाची... नव्या साईटसाठी.. नव्या वादावादीसाठी...