Sunday, October 26, 2008

अक्षर चिवडा

थॅंक्‍स...तुम्हा साऱ्यांनी दीपोत्सवला इतका भरभरून प्रतिसाद दिलात की आभार व्यक्त करायला शब्दच नाहीत. नम्रपणानं सांगते, की तुम्हा साऱ्यांच्या प्रतिसादानं आम्ही अगदी भरून पावलो आहोत.

तुमच्या सूचनाही आमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहा. आमचा डिझाइनचा गोंधळ कसा डेव्हलप होत गेला याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून हा "अक्षर चिवडा'. दीपोत्सव डिझाइन बनण्याच्या काळातील आहेत ही स्क्रिबल्स...


Click on image to enlarge.


Click on image to enlarge.

Click on image to enlarge।


आता पुढच्या साइटचं काम सुरू झालं आहे...पुन्हा आमचं आवडतं चक्र सुरू झालं आहे म्हणा ना...

ता।क - किरणने अजून दीपोत्सवची व्हिडीओ टेम्प्लेट दिलेली नाही।

Friday, October 24, 2008

कशासाठी असते ही धावपळ ?

धन्यवाद चित्रा आणि किरण...!

या ब्लॉगला अधिक 'Intersting' केल्याबद्दल...

या ब्लॉगचा उद्देश पहिल्याच पोस्टमध्ये  सांगितला आहे. 

इथं, esakal.com मध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करीत असतो. मीडिया हाऊसमध्ये जी काही धावपळ चालते, ती सगळीच नेहमी, अगदी 24x7x365 न चुकलेली. 

एक मुलभूत प्रश्न या धावपळीत  बहुतांश विसरूनच जातो...

कशासाठी असते ही धावपळ ? 

ती धावपळ ज्यांच्यासाठी चालते, त्यांना पेपरमध्ये 'वाचक', टीव्हीवर 'व्ह्युअर', रेडिओवर 'श्रोते, लिस्नर' आणि इंटरनेटवर 'ऑनलाईन ऑडियन्स' म्हणतात...! 

ज्यांच्यासाठी सगळी धावाधाव चालते, त्यांना ती पसंत पडतेय का?, पडत नसेल तर काय चुकतंय? पसंत पडत असेल, तर आणखी काय हवंय? ते कसं द्यायचं? ते देताना आमच्या 'limitations' काय? त्या कशा ओलांडता येतील...? अशा असंख्य शंका इथं मांडतोय आम्ही. कदाचित पेपरमध्ये हे अशक्य आहे, रोज वाचकांशी संपर्क साधणं. पण, इथं ऑनलाईन मीडियात शक्य आहे. तुमच्याशी रोजच्या रोज बोलणं. 

त्यासाठी हे ब्लॉगचं माध्यम.

दिवाळीच्या या साईटचं तुम्ही भरभरून स्वागत केलंयच. या साईटमधला प्रत्येक सेक्शन सजवलाय तो किरण, चित्रा आणि प्रियानं. ऑडिओ-व्हिडिओ हे esakal.com  चं वेगळेपण राहिलंय. किमान भाषिक वेबसाईटस् मध्येतरी. ते अधिक रेखीवपणानं दिवाळीच्या साईटवर मांडलं गेलंय. वेबसाईट म्हणून सगळ्या वैशिष्ट्यांसह दिवाळीत ई सकाळ सादर झालाय.

आता, त्यात तुमचाही सहभाग आता हवायंच. तुमच्याकडच्या दिवाळीचा. तिथल्या सेलिब्रेशनचा....

दिपोत्सवा'ची गोष्ट

नमस्कार,

मी किरण.
चित्रानी आमच्या भांडाभांडी, वादावादीबद्दल लिहीलेलं बघितलं आणि मला पण लिहायची खुमखुमी आली. पण माझ्यासाठी हे असं स्वतःला व्यक्त करणं हे जरा अवघड आहे. चित्राबाईतर हाडाच्या पत्रकार, त्यामुळे लिहिणं त्यांना काही अवघड नाही. नको म्हटलं तरी लिहीतात. पण म्हटलं चला प्रयत्न तर करूयात जमलं तर जमलं... नाही तर नाही.

ई सकाळ साठी आम्ही केलेली ही सातवी किंवा आठवी साईट आहे. प्रत्येक साईटच्या वेळी वादावादी ही ठरलेलीच. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी केलेली "मोरया'ची साईट अप झाल्याबरोबरच चित्राची भूणभूण सुरू लागली. दीपोत्सवचं डिझाईन कधी करायचं. माझं मुळ काम हे "सकाळ'च्या प्रिंट एडिशनचं. ई सकाळचं काम हे फावल्या वेळातलं. त्यात दिवाळीचा सिझन प्रिंटसाठी फारच महत्त्वाचा. त्यामुळे किती वेळ देता येईल सांगता येत नव्हतं. त्यात यांचा ससेमीरा मागे लागलेला. इथे आमची नवी वेब डिझायनर प्रिया मदतीला आली. डिझाईनचा पार्ट मी आणि html कोडींग तिनं करायचं अशी मांडवली झाली. आणि साईटचं काम सुरू झालं. 22 ऑक्‍टोबरचा मुहूर्त साईटच्या लाईव्ह टेस्टींगसाठी ठरला. नेहमीप्रमाणे चित्रानं कुठल्यातरी वहीतल्या कागदावर खरडून ठेवलेला साईट प्लॅन सादर केला आणि वादावादीचा श्रीगणेशा झाला. मी चिडचीड केल्यावर माझ्यावर जळफळत का होईना चित्रानी व्यवस्थित टाईप करून साईट प्लॅन तयार केला. जसजसं काम सुरू झालं तसतसं चित्रानी आपल्यामागे किती काम लावलंय याचा अंदाज यायला लागला. सेक्‍शन्स, सबसेक्‍शन्स, ऑडिओ दिवाळी अंक "बोलता बोलता', स्वरोत्सव.... इत्यादी इत्यादी सेक्‍शन्स बघून घाम फुटला. बर बाईंनी त्यांचं काम आधीच सुरू केलेलं आणि आमच्याकडे मात्र कमी दिवस. त्यात आम्ही एकत्र आलो की चित्रानी ""चला आढावा बैठक घेऊया'' असं म्हणण्याचा नवा उपक्रम सुरू केला. त्यामुळे आमच्या नव्या डिझायनर गोंधळून गेल्या. तशा त्या कायमच गोंधळलेल्या असतात. त्यात अणखी ही भर. त्यांना या असल्या प्रकारांची सवय नव्हती. मी प्रिंटमध्ये असल्याने माझी कामाची जागा वेगळी आहे पण प्रिया बिचारी चित्राच्या शेजारीच बसायला. मग काय सांगता! (समजून घ्या.)

असो, मग यातून रोजच्या रोज करायच्या कामांची यादी केली गेली आणि प्रिया बाईंनी धडाडीनी कामाला सुरवात केली. आणि एक काम चार वेळा केल्याशिवाय तिला ते काम पूर्ण केल्याचा आनंदच मिळत नाही की काय असं वाटायला लागलं. अर्थात नवीन असल्यामुळे हे होत होतं. होता होता साईट शेवटच्या टप्प्यात आली. आणि त्याचवेळी चित्रानी होमपेजवरची बटन्स बटबटीत झालेली आहेत असं घोषीत केलं. आणि मोठ्या कष्टानी चित्रानी एडिटींग करून तयार केलेले ऑडिओ ड्राय वाटताहेत असं मी घोषीत केलं. झालं..... पुन्हा वादावादी....मला डिझायनिंग मधलं कसं कळत नाही आणि त्यांचं संपादकीय ज्ञान हे कसं अर्धवट आहे हे दोघांचंही एकमेकांना सांगून झालं. शेवटी दोघांनीही या गोष्टी मान्य करून पुन्हा केल्या ही गोष्ट अलाहीदा.

आता साईट करायला घेतली की आमची ही भांडणं सगळ्यांना नेहमीचीच झालीयेत. आमच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. आणि चित्रा म्हणजे बोलण्यात कुणाला हार जाणारी नाही. रागावल्यावर त्यांची मुक्ताफळं ऐकली की भलेभले गार होतात.

त्यात आमच्याकडची आणखी एक वल्ली म्हणजे श्रीयुत विश्‍वनाथ गरुड, न्यूज अपडेटची जबाबदारी सांभाळतात आणि त्याबरोबर आमची साईट झाली की ," तुम्ही xxx ही साईट बघा, तसं करायला पाहिजे " असं म्हणून आगीत तेल ओतायचं कामही आवडीनं करतात.

सम्राटचे, आमच्या वेब एडिटरचे यामध्ये हाल होत असावेत. त्याच्यामागे न्यूज अपडेट्‌सपासून "सकाळ लाईव्ह' या आमच्या एसएमएस सर्व्हिस ला काय एसएमएस द्यायचा , रजा, सुट्‌टांचे नियोजन, ई सकाळच्या वाचकांनी जगभरातून पाठवलेल्या मेल्सना उत्तरं देणं अशी शंभर कामं असतात. त्यामुळे आमची साइट लाईव्ह होईपर्यंत तो वैतागत असणार, म्हणजे तो दाखवतो तरी तसं... उगाच नाही त्याला वेबएडिटर केला.

असो, होता होता 18 तारीख उगवली आणि एक दिवस काम करता करता चित्रा मॅडमनी त्यांच्या थैलीतून सफरचंद काढलं आणि केली सुरवात गिळायला. आम्ही (म्हणजे मी) तिला म्हटलं एकटीच काय खातेस, पचणार नाही. यावर उत्तर... ""अरे जा रे, खड्डयात गेलास''. पण शेवटी जे व्हायला नको तेच झालं.. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली. दुसऱ्या दिवशी बाईंचा फोन... तुझी बत्तीशी वाजली, आजारी पडलेय.. अख्खे तीन दिवस बाई गायब. बिचारे डिझायनर हवालदिल. पण शेवटी ठरल्याप्रमाणे 22 तारखेला साईट ऑनलाईन टेस्टींगला गेली आणि आता साईट लाईव्ह पण झालीये. आता आम्ही वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची. आम्ही कितीही भांडलो, वादावादी झाली तरी शेवटी हे सगळं आपल्यापरीनं साईट चांगली होण्यासाठीच असतं. फक्त हे साइट लाईव्ह झाल्यावर आमच्या लक्षात येतं. लोकांच्या साईटविषयीच्या चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या की आम्ही परत तयारी करतो आमच्या मनाची... नव्या साईटसाठी.. नव्या वादावादीसाठी...

Tuesday, October 21, 2008

भांडाभांडी-वादावादी

कोणत्याही साईटच्या आधी माझी आणि डिझायनरची वादावादी झाली नाही तर मला साईट बरोबर चालली आहे याचा कॉन्फिडन्स येतच नाही. किरण, आमचा मॅनेजर, डिझाईन ...याच्याशी अगदी साईट लाइव्ह करेपर्यंत वाद सुरू असतो. मी त्याला काही डिझाईनची अक्कल शिकवणं आणि मग त्यानं प्रत्युत्तर म्हणून मला काही इडिटोरिअल ज्ञान देणे...हे प्रत्येक साइटच्या वेळी घडलंच पाहिजे...

टीममधले बाकीचे आता आमच्या भांडणांकडे लक्ष देत नाहीत. सम्राटदेखील ऐकल्यासारखं करतो...आणि चक्क दुर्लक्ष करतो...अर्थात तेच बरोबर असतं म्हणा ...कारण साइटचा झेंडा चढवेपर्यंत आम्ही काहीसे वेड्यासारखे वागू लागलेले असतो. त्यात यावेळी अजून एक भर पडली. प्रियाबाईंची. या आमच्या नव्या डिझायनर. ती काहीतरी एकटी पुटपुटत असते. संध्याकाळी सहा वाजता गुड मॉर्निंग म्हटलं तर तीही मॉर्निंग म्हणते इतकी कशाततरी गुंतलेली असते. कोणतंतरी बटन राहिलेलं असतं, काहीतरी सेव्ह होतच नसतं...आणि मग ती म्हणते..."थांब...काहीतरी खूप गोंधळ आहे...मी काय करत होते गं?''...डोळ्यात टोटल चुकल्याचे भाव...म्हणजे हे आमच्याच पठडीतलं रत्न आहे तर !...हं...थोडक्‍यात तिच्यापासून पळ काढून थोड्या वेळाने यावे..तोवर सारं काही सुरळीत चालू झाले असेल...नव्हे असतेच...

तर अशा रितीने दीपोत्सव रेडी...आता काही तासात अप होईल...(यावरूनही आमच्याकडे विनोद..."अहो किती तास झाले...आता करा की साइट लाइव्ह... बातमी तर दिलीत की काही तासात साइट लाइव्ह वगैरे...''
""करणार....करणार...नक्की...याच दिवाळीत... ''- आमचं सौजन्यपूर्ण उत्तर!)

Friday, October 10, 2008

लगान

अकरा ऑक्‍टोबर

आपण एके ठिकाणी असतो...म्हणजे एक टीम म्हणून...आणि आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असतं...तेही टीम म्हणून...हे फार गमतीचं आहे...वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांनी एकत्र येऊन काम करणं...अर्थात तेही एक टीम म्हणून...

या टीमचे जे स्वतंत्र कोन-त्रिकोण- चौकोन-पंचकोन असतात...त्यांनी एकत्र यायचं...पेक्षा त्यांना एकत्र आणायचं हा टास्क असतो...मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करताना हे काम सर्वांत सोपं वाटलं होतं...आणि आता ते सोडून इतर सर्व सोपं वाटतं...

ई सकाळच्या टीममध्येही आता खूप निरनिराळी स्किल्स असलेले पत्रकार आले आहेत...प्रत्येकाचा अनुभव निराळा...बलस्थानं...अ-बलस्थानं निराळी...ते सारं ओळखायचं...स्वतःतलेही गुण - अवगुण त्या निमित्तानं कळत जातात....दिवसागणित निराळे...आणि तितकेच नवे...

वाटतं की खरं तर आपले अभ्यासक्रम फार एकांगी असतात. दोन अधिक दोन चार असं शिकवतात...आणि ते कधीच बरोबर नसतं...म्हणजे खऱ्याखऱ्या जगात...त्यामुळे "सॉफ्ट स्किल्स'चा एक स्वतंत्र अभ्यासक्रम सर्वच्या सर्व शाखांसाठी कम्पल्सरी केला पाहिजे...

म्हणजे आता बघा...सचोटी, स्पष्टवक्तेपणा, दोन अधिक दोन चार ही वृत्ती...पुस्तकात अधोरेखीत करायला भारी वाटतात...पण एकाचा तरी प्रत्यक्षात उपयोग होतो का...तर शून्य...अक्षरशः...

पण हे सारं शिकणं मजेचं आहे खरं...कारण शेवटी आपण माणसांबरोबर काम करतो...निरनिराळ्या स्वभावाच्या, बुद्धीच्या, आवाका निराळा असलेल्यांच्या...ते करत असताना...हळूहळू आपण बदलतो...हे बदलणं फार भारीचं असतं...म्हणजे "टीम'चा एक भाग म्हणून बरेचदा "ऍडजस्टमंट' या सदराखाली आपण जे करतो....त्यामुळे आपल्यात "माणूस' म्हणून बदल होतो...आणि तो फायदा संस्थेचा तर असतोच...पण सर्वांत जास्त आपला स्वतःचा असतो...

Thursday, October 9, 2008

रंगीत दिवस...

दहा ऑक्‍टोबर

रेकॉर्डींगचा चिवडा नीट आटपला म्हणजे मिळवली...आता स्टुडिओ आणि गायक, वादक यांच्या वेळा बांधून घातल्या आहेत...पण सारं काही "सूरात' झालं की हुश्‍श...यावेळी सुगम आणि शास्त्रीय संगीताची सुरेल झलक वाचकांना सादर करावी असा बेत आहे...

दिवाळीच्या वेळी ई सकाळवरची साईट बघणाऱ्या वाचकांना ...त्यांना अपील होईल, आवडेल, आनंद देईल असं काहीतरी द्यायचं म्हणजे त्यात सूर तर हवेतच...त्यामुळे निरनिराळ्या प्रहरातले राग...त्यांची शास्त्रीय संगीतातली बांधणी आणि या रागामधे बांधलेलं गाणं...असं करावसं वाटत आहे...

काही वर्षांपूर्वी पुण्यातून मुंबईत कामासाठी जाताना उत्साह खूप होता...मुंबईत भरपूर काम करून, अनुभव गाठीशी बांधून मग जेव्हा पुण्यात परत यायचं घटलं...तेव्हा आपण चूक तर नाही करत असं वाटत होतं...पुण्यात येऊन परत कोणत्यातरी पेपर, रेडिओ, टीव्हीसाठी काम करायचं...हे बोअर वाटत होतं...तेव्हा हे ऑनलाइनचं काम हाती पडलं आणि धमाल आली...पहिलं वर्ष तर शब्दशः कल्ला केला...सगळे नवीन...कामही नवीन...असं असलं पाहिजडे सांगणारं कोणी नाही...क्रिएटिव्हिटीला कितीही पल्ला गाठू दे...काही लिमीट नव्हतंच...मजा आली...

तर...हे दिवाळीचं फीचर...काम करताना...मग ते छोटं असो, मोठं असो...आपण ते किती "निराळं' करतो याला महत्त्व...म्हणजे इतरांसाठी नाही...आपला दिवस रंगीत करण्यासाठी...

तर आता दिवस रंगतदार झाले आहेत...तुम्हाला यंदाच्या दीपोत्सवात काय बघायला, ऐकायला, वाचायला आवडेल कळवा जरूर...

"कनेक्‍ट"

कोणाकडून काय गाऊन घेऊया...लिहून घेऊया...कसं, केव्हा, कधी...डेडलाईन काय...हे सगळं जुगाड कसं जमणार...बजेट काय...हे अन्‌ ते...बोलाचाली, भांडणसदृश संभाषण, मग कामाचे विविध टप्पे, आणि मग...फायनल प्रोडक्‍ट...

प्लॅन करायला मला फार मजा येते. आमच्याकडे फीचरचेही दिवस असतात. श्रावणापासून डिसेंबरपर्यंत फीचरची गर्दी असते.

"हे माझं कामच आहे' ...इतकं ड्राय असलं तरी फीचर प्लॅन करणं हा इतका स्वतःशी "कनेक्‍ट' करणारा अनुभव असतो...आणि त्या "कळा' शेअर करायला तुम्ही सारे आहात हे आणखी विशेष...ई सकाळवरची फीचर आवर्जून पाहाणारे, त्यावर प्रतिक्रिया देणारे...

फीचरच्या हंगामात, घरून ऑफीसला येईपर्यंत, सगळी रोजची कामं करताना घाई होते. कधी ऑफीसला पोहोचतोय, चहा घेतोय आणि स्वतःमध्ये रमतोय असं होतं...हा काळ फार मस्त असतो. डोक्‍यात काहीबाही चालू असतं आणि सतत "वेगळं' काही हवं असतं. ते सुचेपर्यंतचा वेळ हा माझा सर्वांत आवडता ! ती अस्वस्थता भारी हवीशी वाटते.

आताही नवरात्रीची मायक्रोसाईट अजून ई सकाळवर आहे आणि मी दिवाळी फीचर प्लॅनसाठी जुनी झालेली, काहीतरी गिरमिट केलेली वही घेऊन बसले आहे. दिवाळीचं फीचर म्हणजे नेहमीचं - लागणारं या सदराखाली येणारं मॅटर तर असेलच...पण वेगळं काय?

...काहीही सुचत असतं, काही टाकाऊ, काही खरंच छान पण प्रत्यक्षात येणं दुरापास्त असलेलं...वहीची पानं गिचमिडीत भरतात...मग हळूहळू चहाच्या पुढच्या कपासोबत साऱ्या गिरमिटाला अर्थ येतो. ई सकाळच्या टीमनं सुचवलेल्या कल्पना, त्यांचा सहभाग हे सगळं काही पांढऱ्यावर काळं करायचं असतं...

मागच्यावेळीही दिवाळीची मायक्रोसाईट करताना धमाल आली होती. तेव्हाचे सहकारी मात्र आता नाहीयेत...कुठेकुठे गेलेत... असो...

सगळे म्हणतात मला, की तेच ते करून कंटाळा नाही का येत....येतो... आणि नाहीही...कारण नवं काही करायचं ही इच्छा असते आणि मग या सगळ्या "त्याच त्या'पणातून काहीतरी छानदार सुचतं...एकच अक्षर खूपदा गिरवल्यावर मग छान यायला लागतं तसं...